भारतातले आफ्रिकन

भारतातले आफ्रिकन

हिंदुस्थान हा देश अनेक जाती, धर्म, विचारधारा, पंथ तसेच मानवी समुदायाचा बनलेला आहे. हजारो वर्षांपासून जगभरातून अनेक समुदाय येथे स्थलांतरित होऊन आले. तुर्क, अफगाणी, इराणी, मंगोलियन, अरब अशा अनेक वंशांचे लोक येथे व्यापार किंवा इतर उद्देशाने आले आणि स्थिरावले. आज ते देखील लोक पक्के भारतीय आहेत जितके आपण आहोत. दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतल्या अनेक देशांतून गुलाम आलेले (आणलेले असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल) लोक देखील भारत आणि पाकिस्तानात आढळतात. भारतात गुजरात, हैदराबाद, कर्नाटक, दमण तर पाकिस्तानात हे लोक कराची या शहरात आढळतात.

ब्रिटीश इंडियामधे भारतात सुमारे ५४० स्वायत्त संस्थाने होती. गुजरातच्या सौराष्ट्र भागात असलेले जुनागड हे मुख्य संस्थान. या संस्थानाचा नवाब फार विचीत्र आणि विलासी होता, त्याच्या सुरस कथा आजदेखील त्याभागात रंगवून सांगितल्या जातात. यांच्याकडे शेकडो कुत्रे होते आणि त्यावेळी त्याने हजारो रुपये खर्च करून कुत्र्यांची लग्ने मोठ्या थाटात लावून दिली होती. जुनागड संस्थानात सासणगीर नावाचे एक खेडे आहे ज्याला आता गीर म्हणून ओळखले जाते. आशियायी सिंहांकरिता येथील जंगल जगप्रसिद्ध आहे, जगात सिंह फक्त दोनच ठिकाणी जंगलात आढळतात एक म्हणजे आफ्रिकेत आणि गीर येथे. गेल्या ४० वर्षात गुजरात सरकारने सिंहाची संख्या वाढवण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले त्याचे फळ म्हणून आज या जंगलात ५२३ सिंह आहेत. ब्रिटीश इंडियामधे बेसुमार शिकारीमुळे ही संख्या १०० पेक्षा खाली गेली होती. आफ्रिकन लोक आणि सिंह यांचं एक वेगळंच नातं आहे, आफ्रिकन लोक सिंहाला घाबरत नाहीत. त्यांच्या सोंबत राहतात, आपण याविषयी बऱ्याच Documentary YouTube वर पाहू शकता.

जुनागढच्या त्याकाळच्या नवाबाने सुमारे ३०० वर्षांपूर्वी वेगवेगळ्या कामांसाठी तसेच आपले खाजगी अंगरक्षक म्हणून आफ्रिकेतून गुलाम आणण्यास सुरवात केली. आफ्रिकन लोक खुप काटक असतात, कुठल्याही परिस्थितीत ते मोठ्या कष्टाची कामे करू शकतात. आफ्रिकन मंडळी जुनागडात स्थिरावली. कालांतराने भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर जुनागडचा नवाब आपले १०० पेक्षा जास्त कुत्रे घेऊन पाकिस्तानात पळाला, जाताना त्याचा सर्व बेगम तो हिंदुस्थानात ठेऊन गेला. पण स्वातंत्रानंतर देखील या आफ्रिकन जमाती जुनागढच्या आसपासचं राहिल्या. तलाला, जुनागड, गीर, दमण, दीव या भागात ही मंडळी आढळतात यातील तलाला गाव आणि परिसरात यांची संख्या सर्वाधिक आहे, सुमारे १३ हजार पेक्षा जास्त. आज ही मंडळी जंगलात लायन ट्रॅकर, गाईड म्हणून सरकारी नोकरी तसेच शेती करतात. उत्तम गुजराती भाषा बोलतात. पण आजही ते आपल्या मूळ परंपरा जपून आहेत. गीर आणि परिसरात असलेल्या रिसॉर्ट्समधे पर्यटकांसाठी त्यांचे पारंपरिक नृत्य दाखवतात ज्याला धमाल डान्स सुद्धा म्हणतात.

  • 19 September 2018