सौराष्ट्र दर्शन

सौराष्ट्र दर्शन

गुजरात या राज्यातील सौराष्ट्र भागात आम्ही विहार हॉलिडेजमार्फत ग्रुप ट्रिप आयोजित करत असतो. एका वर्षातून साधारण तीन ते चार सहली होतात आणि चोखंदळ पर्यटक त्याला उत्तम प्रतिसाद देतात. या वर्षीची पहिली सौराष्ट्र दर्शन सहल १९ ते २३ सप्टेंबर २०१८ पार पडली. त्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.

दिनांक १९ सप्टेंबर २०१८ रोजी सर्व पर्यटक जामनगर येथे पोहोचले. त्या ठिकाणी आम्ही त्यांचे स्वागत केले. त्यानंतर आमच्या वातानुकूलित गाडीतून प्रवासाला सुरुवात झाली. जामनगर येथील चेतना उपहारगृहात गुजराती पद्धतीचे सुग्रास भोजन घेऊन आम्ही द्वारकेकडे प्रयाण केले. हा प्रवास आम्ही अडीच तासात पूर्ण केला. हॉटेलमध्ये चेक इन करून फ्रेश झाल्यानंतर सर्व पर्यटकांना आम्ही द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी घेऊन गेलो. त्या ठिकाणी आमचे पंडित प्रेममहाराज यांनी आम्हाला द्वारकेबद्धल इत्यंभूत माहिती दिली. द्वारकाधीशाचे मनसोक्त दर्शन घेऊन सर्वजण हॉटेलला परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी नास्ता उरकून आम्ही बेट द्वारका, रुक्मिणी मंदिर, नागेश्वर गोपीनाथ तसेच गोपी तलाव हे पाहण्यासाठी निघालो. ओखा येथून मोठ्या होडीतून आम्ही बेट द्वारकेला पोहोचलो तेथे दर्शन घेऊन मग पुन्हा बोटीने ओखा येथे परतून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नागेश्वर गोपीनाथ महादेवाचे दर्शन घेतले. तसेच रुक्मिणी मंदिर आणि गोपी तलाव देखील पाहिला. दुपारच्या भोजनानंतर थोडी विश्रांती घेऊन पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी सनसेट पॉईंट येथे पोहोचले. अथांग सागराच्या साक्षीने सूर्यास्त पाहणे हा खरोखरच एक अविस्मरणीय अनुभव होता.

तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सोमनाथच्या दिशेने प्रयाण केले, वाटेत पोरबंदर येथे सुदामा मंदिर तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जन्मठिकाण असलेले कीर्ती मंदिर पाहिले. पुढे मोचा या गावात जागृत हनुमान आश्रम पाहिला आणि त्या ठिकाणी प्रसाद म्हणून थंडगार ताक घेतले. मूळची फ्रान्सची नागरिक असलेली महिला संन्यास घेऊन या ठिकाणी हा अतिशय सुंदर असा आश्रम चालवत आहे. चोरवाड येथे आम्ही धीरूभाई अंबानी यांचे मूळ घर पाहिले. या घरात आता उत्तम असे वस्तू संग्रहालय आहे. त्या नंतर आम्ही सोमनाथ येथे पोहोचून भालकातीर्थ, त्रिवेणीसंगम आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या सोमनाथाचे दर्शन घेतले. १६ वेळा मुघल आक्रमकांद्वारे उध्वस्त करण्यात आलेले सोमनाथ मंदिर स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने आज दिमाखात उभे आहे. देवळाच्या मागे अथांग समुद्र आहे. फारशी गर्दी नसल्यामुळे सोमनाथाचे दर्शन अतिशय उत्तम झाले.

चौथ्या दिवशी सकाळी आम्ही सासणगीर येथे मार्गस्थ झालो. तेथे दक्ष या जंगलात असलेल्या सुंदर अशा रिसॉर्टमध्ये पोहोचलो. तिकडे सर्व पर्यटकांनी काठियावाडी पद्धतीचे चविष्ठ भोजन आणि त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये पोहोण्याचा आनंद लुटला. त्यानंतर गीरच्या जंगलात कोल्हा, बिबळ्या, मोर विविध प्रकारचे पक्षी तसेच जंगलचा राजा असलेल्या सिहाने आम्हाला दर्शन दिले. नंतर आमच्या रिसॉर्टमध्ये आम्ही आमच्या पर्यटकांसाठी खास धमाल नृत्य आयोजित केले होते. मूळचे आफ्रिकेतले असलेले पण गेल्या सहाशे वर्षांपासून गीर परिसरात स्थायिक झालेले आणि आता पक्के भारतीय असलेले आफ्रिकन्स हे नृत्य सादर करतात.

सहलीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी आम्ही जुनागढ येथे उपरकोट किल्ला पाहिला, वीरपूर येथे संत जलराम बाबा यांचे दर्शन घेतले, जेतपूर येथे मनसोक्त शॉपिंग करून आम्ही गोंडल येथे पोहोचलो आणि तेथे राजाचा महाल, जुन्या गाड्यांचा संग्रह पाहून राजकोटच्या दिशेने पोहोचलो. याठिकाणी एकमेकांचा निरोप घेताना पर्यटकांना भरून आले होते, कारण गेली पाच दिवस आमच्या सर्व पर्यटकांचे एक कुटुंबच तयार झाले होते. हॉटेल्स, भोजन, वाहन, स्थलदर्शन अशा सर्वच बाबतीत पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.

  • 19 September 2018