दक्षिण दर्शन - कर्नाटक

दक्षिण दर्शन - कर्नाटक

दक्षिण भारत हा स्थापत्यकलेसाठी सुप्रसिद्ध आहे हे आपण जाणतोच. स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध असलेली सुंदर देवळे पाहण्यासाठी अनेक पर्यटक तामिळनाडूत जातात. त्याचप्रमाणे कर्नाटक या राज्यातदेखील थक्क करायला लावणारी स्थापत्यकला पाहायला मिळते, सर्वच शिल्पे साधारण विजयनगर साम्राज्य काळातली आहेत. समुद्र, पर्वत, बर्फ, पार्क्स, उद्याने या गोष्टी पाहून कंटाळा आला आहे किंवा वेगळं काहीतरी पाहायचा आहे, इतिहास जाणून घायचा आहे अशा पर्यटकांसाठी आम्ही कर्नाटक राज्यातील काही सुंदर सहली घेऊन आलो आहोत.

सहलीची सुरवात आपण बंगलोरहून करतो, श्रावणबेळगोळा येथे जैन मंदिरांना भेट दिल्यानंतर आपला मुक्काम हसन येथे असतो (याला मिनी उटी असे देखील म्हटले जाते) हसन येथें बेलूर येथे जाताना डोडागडबेल्ली येथे अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे लक्ष्मी मंदिर पाहतो, मग बेलूर येथे चन्नकेशवा मंदिर.. चन्ना म्हणजे सुंदर आणि केशवा म्हणजे विष्णू ,विष्णूवर्धन याने १२ व्या शतकात बांधलेले हे भव्य देऊळ म्हणजे स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना आहे.. हे देऊळ पाहून आपण हळेबिडू येथील शिवमंदिर (होयसळेश्वर) पाहण्यास प्रस्थान करतो. काळ्या दगडात बांधलेले हे भव्य देऊळ आहे. १४ शे व्य शतकात मुस्लिम आक्रमकांनी हे देऊळ लुटले आणि त्याची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. सध्या या देवळात पूजा होत नाही.

सहलीचे पुढील आकर्षण असते ते म्हणजे हंपी, हंपीसाठी आपण होस्पेट येथे मुक्काम करतो. पर्यटकांच्या सोयीनुसार आपण १ किंवा २ दिवस हंपीचा विशाल परिसर पाहू शकतो. हंपीचा विशाल परिसर, देवळे, बाजार अशा अनेक गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला सातव्या शतकात विजयनगर साम्राज्य यशाच्या कोणत्या शिखरावर असेल याची थोडीशी कल्पना येते. येथील उत्खननांत अजून देखील हिरे, सोनं, चांदी सापडल्याची नोंद आहे. हंपीचा परिसर अतिभव्य आहे. तुंगभद्रा नदीपलीकडे रामायणाच्या खुणा आढळतात.. किष्किंधा नगरी, पम्पा सरोवर सगळंच डोळ्याचं पारणं फेडणारं आहे. हंपी येथून पाहिलेला सूर्यास्त आपण कधीही विसरू शकत नाही.

हंपीहून बदामीला पोहोचताना वाटेत आपण ऐहोळ आणि पट्टदखल पाहतो , विजयनगर साम्राज्यात कलेला किती प्रोत्साहन दिले जात असेल याचा अंदाज येथील शिल्पे आणि देवळे पाहून येतो. पट्टदखलची देवळे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा कळस आहे असे अनेक जाणकार सांगतात. बदामी येथील गुहेतील शिल्पे आपल्याला अनोख्या विश्वात घेऊन जातात येथील उंचावरील शिल्पे पाहताना बदामी गावाचे विहंगम दृश्य दिसते. अतिशय जागृत देवस्थान असलेल्या बनशंकरी मातेचे पवित्र दर्शन आपल्याला नक्कीच सुखावते.

हुबळीकडे जाताना लागणारा गोकाक येथील धबधबा प्रेक्षणीय आहे तर सौंदत्ती येथील रेणुका मातेचे दर्शन आपली सहल सुफल आणि संपूर्ण झाल्याची खात्री देते. सर्वच ठिकाणी दक्षिण भारतीय पद्धतीचे सुग्रास भोजन उपलब्ध असते. या थाळीत पुऱ्या किंवा पोळ्या , भात , सांबार , रस्सम , २ भाज्या , दही , डाळ , २ चटण्या असतात.

कर्नाटकाला नक्की भेट द्या , इथला प्रत्येक दगड आपल्याशी संवाद साधेल.

  • 2018