हीच खरी सप्तपदी..!

हीच खरी सप्तपदी..!

गेले अनेक महिने विहार हॉलिडेजचं नाव समोर येत होतं. चांगली सेवा आणि दर्जेदार व्यवस्था असल्यामुळे लग्नानंतर फिरायला जाण्यासाठी आम्ही विहार हॉलिडेजचीच कास धरली. बुकिंग झाल्यावर त्यांचेकडून सतत फॉलोअप घेतले जात होते, पुढली सर्व व्यवस्था समजवून दिली जात होती, त्यात कोरोनामुळे विमानांचे नियम सतत बदलत होते, वेळा बदलत होत्या, पण विहारचे सारंग स्वतः सगळीकडे फॉलोअप घेत होते व योग्य तो प्रतिसाद देत होते.. दोघांनीच केलेला हा पहिलाच प्रवास, त्याची इतकी सुंदर व्यवस्था लावून दिल्याबद्दल खरच आभार..

तर, केल्याने देशाटन म्हणत आम्ही दक्षिण भारतातल्या, कर्नाटकमधल्या 'कुर्ग'ची वाट पकडली. नैसर्गिक संसाधनांची समृद्धी म्हणजे काय, तिथे गेल्यावर समजतं. चहा-कॉफीचे तुमची नजर जाईल इथपर्यंत मळे, मसाल्यांच्या जिन्नसांची सरबराई, पट्टेरी वाघ व हत्तींसारखे अजस्त्र प्राणी सहज मिसळून घेणारा प्रदेश. रेडवूड, चंदनासारख्या विविध महागड्या झाडांचे भलेमोठे भूभाग इथे आहेत. आणि ऊटी किंवा मसुरी सारखं, बाजारीकरण अजून झालेलं नाही त्यामुळे नयनरम्य दृश्यांची रेलचेल आहे.

आमचा गाईड + ड्रायव्हर असणारा श्रीनिवास अगदी वल्ली माणूस होता, गेली २० वर्षे या व्यवसायात असणारा हा इसम देशविदेशातील शेकडो पर्यटकांना संपूर्ण दक्षिण भारत फिरवून आणतो, आणि इतक्या वर्षांच्या अनुभवातून त्याने जवळपासचे हॉटेल्स, खाण्यापिण्याच्या जागा, पर्यटन स्थळं, आणि तिथल्या भाषा संस्कृती आत्मसात केल्या आहेत. इंग्रजी हिंदीसह, ८ भाषा त्याला अस्खलित येतात. तसेच, संस्कृत व आयुर्वेदामध्ये रुची आहे त्यामुळे, प्रवास करता करता सहज अनेक गोष्टी तो सांगून जातो.

कुर्गला दूबारे म्हणून हत्तींचा कॅम्प आहे, तिथे पोहोचण्याकरिता तुम्हाला मधली नदी पार करून जायला लागतं. त्यासाठी बोटींची सुद्धा व्यवस्था आहे आणि प्रवाह कमी असेल तर गुडघाभर पाण्यातून साधारण अर्धा किमी चालत पलीकडे जाता येतं, बोटींसाठीची रांग बघून आम्ही पाण्यातून जाण्याचा मार्ग निवडला. पायातले बूट हातात घेऊन आम्ही हातात हात धरून वाटचाल करू लागलो, साधारण १० पावले चालल्यावर अचानक तोल गेला आणि, सौंच्या हातातून बूट सटकुन पाण्यात पडले, वाहत जाऊ लागले, सौ बूट वाचण्यासाठी पाण्याचा प्रवाह लक्षात न घेता त्याच्यामागे जाऊ लागल्या, शेवटी त्यांना एका ठिकाणी उभं करून आपल्या लांबलचक शरीराचा फायदा घेत, बूट पकडला, आणि परत आणला.. मजल दरमजल करत हातात हात धरून आम्ही तीरावर पोचलो, आणि मागून 'सौं'चा आवाज, "सप्तपदी यापेक्षा वेगळी असते का!?"


- मिहीर बापट, पुणे
८९ ८३७ ७८ १०३

  • 29 January 2021