प्रवास विम्याचं महत्व

प्रवास विम्याचं महत्व

नमस्कार , गेले काही दिवस जेट एअरवेजचा काय गोंधळ सुरु होता ते आपण सर्वानी अनुभवलं, शेवटी ३ दिवसापूर्वी जेटची सर्व उड्डाणे अधिकृतरीत्या बंद झाली. जवळजवळ २०,००० कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. अनेक प्रवाशांचे देखील अतोनात हाल झाले. अशा वेळी प्रवास विमा अर्थात ट्रॅव्हल इन्शुरन्सचं महत्व अधोरेखित होतं.

देशविदेशातील कोणत्याही सहलीची विक्री करताना आम्ही आमच्या पर्यटकांना ट्रॅव्हल इन्शुरन्सचा आग्रह करतो इतकंच नव्हे तर आमच्या सर्वच आंतरराष्ट्रीय सहलींमधे आम्ही ट्रॅव्हल इन्शुरन्स समाविष्ठ केलेलाच असतो. पण आजचा जमाना कॉस्ट कटिंगचा आहे, लोकांना विकत घेताना स्वस्त उत्पादन हवं आहे, नंतर कितीही त्रास झाला तरी चालेल. ट्रॅव्हल इन्शुरन्समधे पासपोर्ट लॉस, उड्डणांना विलंब, विमान रद्द होणे, डिले होणे, हायजॅक होणे, आपले सामान हरवणे - बॅग खराब होणे, सहलीवर आजारी पडून हॉस्पिटलमधे भरती होणे असे कितीतरी फायदे समाविष्ठ असतात. सगळ्या गोष्टींचा उल्लेख याठिकाणी करणे शक्य नाही. बरं या ट्रॅव्हल इन्शुरन्सची किंमत अतिशय किरकोळ असते. जर आपण सहलीसाठी हजारो / लाखो रुपये खर्च करत असाल तर काही शे रुपयांचा विमा खरेदी करणं हे नक्कीच आवश्यक आहे. एक जबाबदार पर्यटन संस्था म्हणून आम्ही आमच्या आंतरराष्ट्रीय सहलींमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स समाविष्ठ केलेला असतो पण आजकाल त्यांची किंमत तुमच्यापेक्षा ८०० रुपयांनी कमी आहे असं सांगून आम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढून टाकायला सांगतात आणि आम्हाला इच्छा नसताना ते करावं लागतं.

आमच्या सहलीवर नुकतंच एक मोठं कुटुंब थायलंडला गेलं होता ,त्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला नव्हता, बँकॉक वरून मुंबईला येणारी त्यांचं जेटचं विमान रद्द झालं आणि ऐनवेळी त्यांना अठ्ठावन्न हजार रुपये जास्तीचे खर्च करून वेगळ्या विमानाचं तिकीट काढावं लागलं, त्यांनी ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतला असता तर त्यांचे हे सर्व पैसे वाचले असते. अशी अनेक उदाहरणे मी माझ्या १५ वर्षाच्या ट्रॅव्हल करियरमधे जवळून पहिली आहेत. असो.

सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात सुरु आहे, आपण कोणत्याही कंपनी कडून सहल बुक केलेली असुदे पण काही शे रुपये वाचवण्यासाठी आपले हजारो / लाखो रुपये धोक्यात टाकू नका, सर्व कंपन्या ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्स उपलब्ध करून देतात तरी मी वैयक्तिकरित्या आपल्याला सल्ला देईन ऑनलाईन ट्रॅव्हल इन्शुरन्सच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपल्या चांगल्या ओळखीच्या इन्शुरन्स ब्रोकर कडून ट्रॅव्हल इन्शुरन्स घ्या आणि निर्धास्तपणे सहलीचा आनंद लुटा.

  • 20 April 2019